नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार ,१०० दिवसांच्या कृषी कृती आराखड्यासंदर्भात बुधवारी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.कृषी क्षेत्राच्या सातत्यपूर्ण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार कामे जलद गतीने व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकरीभिमुख काम करण्यावर आपले आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करावे अशी सूचना शिवराजसिंह चौहान यांनी या अधिकाऱ्यांना केली.
यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाअंतर्गतच्या पहिल्या 100 दिवसांच्या विभागीय कृती आराखड्यामधील सर्व बाबी आणि तपशील समजून घेतले. देशाचे कृषी क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे निर्देश त्यांनी या अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी बांधवांना दर्जेदार खते, बियाणे आणि इतर निविष्ठा उपलब्ध राहतील याची प्राधान्याने सुनिश्चिती करावी अशी सूचनाही त्यांनी केली. याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
देशातले कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढली पाहिजे यावर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर दिला.आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासोबतच आपण जगभरातील इतर देशांना त्यांच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने निर्यात करू शकू यासाठी आपण ठोस कृती आराखडा राबवायला हवा यावरही त्यांनी भर दिला. या बैठकीत सहभागी झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागनिहाय योजनांसंबंधीचे सादरीकरणही केले.