नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या एकास दमदाटी करीत दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना महामार्गावरील आडगाव त्रिफुली भागात घडली. या घटनेत भामट्यांनी फोन पे च्या माध्यमातून रोकड लांबवित मोबाईलही पळविला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनार्दन पुंडलिक उन्हवणे (५६ रा.विमल हॉटेल जवळ,आडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उन्हवणे १९ मे रोजी दुपारच्या सुमारास आडगावातून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. आडगाव त्रिफुली येथील उड्डाणपुलाच्या बोगद्यातून ते रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट आडविली. यावेळी दुचाकीस्वार भामट्यांनी शिवीगाळ व दमदाटी करीत उन्हवणे यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच दमदाटी व धक्काबुक्की करून फोन पे ची माहिती मिळवित भामट्यांनी उन्हवणे यांच्या बँक खात्यातील सुमारे ३० हजार रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यात वर्ग करून मोबाईल घेवून पोबारा केला. या घटनेत मोबाईलसह रोडक असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून अधिक तपास उपनिरीक्षक दायगुडे करीत आहेत.