नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावरणा-या दोघा तडिपारांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. जुने नाशिक परिसरातील वेगवेगळय़ा भागात सोमवारी (दि.१०) ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान फरीद कुरेशी (३० रा.घर नं.३८९२ नानावली) व शोएब समद कुरेशी (३५ रा. कसाईवाडा,वडाळानाका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या महिन्यात सलमान कुरेशी यास तीन महिन्यासाठी तर मार्च महिन्यात रिक्षाचालक शोएब कुरेशी याच्याविरूध्द पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र दोघांचा शहरातच वावर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्यांच्या मागावर असतांना सोमवारी (दि.१०) सलमान कुरेशी द्वारका परिसरातील चिराग ट्रव्हल्स समोर तर शोएब कुरेशी आपल्या घरात मिळून आला. दोघांविरूध्द हद्दपारी आदेशाचा भंग व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अंमलदार दयानंद सोनवणे व पोलीस नाईक अविनाश जुंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.