नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सातारा येथे महाराष्ट्र राज्य ४० व्या कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्यांदाच यशवंत व्यायाम शाळा,नाशिकचा खेळाडू कृष्णा संतोष आंबेकर याने घवघवीत यश प्राप्त केले.
कृष्णाने पुरलेला मल्लखांब या प्रकारात आपले सुंदर कौशल्य सादर करुन कांस्य पदक पटकावले. तर टांगता मल्लखांब या कठीण प्रकारामध्ये अगदी संय्यमाने आपले कौशल्य सादर करुन रौप्य पदकावर आपले नावं कोरले. दोरीचा मल्लखांब या प्रकारातही कृष्णाने सुंदर खेळ करुन ५ वे स्थान मिळविले. या सर्व प्रकारातील कामगिरीच्या एकत्रित गुणसंख्या संख्येचा विचार करता वैयक्तीक विजेतेपदाच्या शर्यतीत यशने संपुर्ण महाराष्ट्रात ४ थे स्थान पटकावले.
कृष्णा आंबेकरच्या या कामगिरीची दखल घेवून त्याचा आणि त्यांचे प्रशिक्षक ऋषीकेश ठाकूर यांना मल्लखांब क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त उदय देशपांडे आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरुखकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यशाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशवंत व्यायाम शाळाआणि नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटील, सचिव रमेश वझे, उपाध्यक्ष विनायक पाठक, उल्हास कुलकर्णी, खजिनदार दत्तात्रेय क्षिरसाठ आणि इतर पदाधिकारी, वरिष्ठ खेळाडूं यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कामगीरीसाठी त्याला त्याचे मार्गदर्शक यशवंत जाधव, पंकज कडलग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.