नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज पुरवठा खंडित झाल्याने सिन्नर एमआयडीसीतील उद्योजकांचे तीन दिवस अतोनात हाल झाले. त्यात पाण्याचे पंप बंद झाल्याने सलग तीन दिवस पाणीपुरवठाच खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याशी संपर्क साधला असता बेळे यांनी तातडीने एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांज्जे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर तातडीने एक पंप सुरू आणि उर्वरित दुसरा पंपही काही काळाने सुरू झाल्याने उद्योजकांनी सुस्कारा सोडला व निमा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.दरम्यान यापुढे भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी एमआयडीसीने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी व सिन्नरसाठी स्वतंत्र फिडर द्यावा आणि तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिन्नरच्या उद्योजकांनी दिला आहे.
अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे सिन्नरमधील उद्योजकांना आधीच मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.त्यात पाण्याचे पंप बंद झाल्याने सलग तीन दिवस पाणीपुरवठाच खंडित झाल्याने उद्योजकांचे जे हाल झाले आणि त्यांनी संतापाला जी वाट मोकळी दिली त्याची माहिती सिन्नर निमाचे पदाधिकारी किरण वाजे ,सुधीर बडगुजर,विश्वजित निकम, प्रविण वाबळे यांनी यावेळी एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सांगून दिली. सिन्नर औद्योगिक वसाहतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या नाशिकरोड येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठ्याप्रमाणात बिघाड होता आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली,असे झांज्जे यांचे लक्षात आणून दिले.दरम्यान निमाच्या पदाधिकाऱ्यांनी झांज्जे यांच्या कार्यालयात जाऊन उद्योजकांच्या मनस्तापाची त्यांना कल्पना दिल्यानंतर झांज्जे व बेळे यांनी तातडीने विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर एक पंप तातडीने सुरू करण्यात यश आले. दुसरा पंपही सुरू करून संपूर्ण एमआयडीसीतील पाणीपुरवठा सुरळीत झाला,असे झांज्जे यांनी सांगितले.भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी.तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून जनित्राची व्यवस्था करून द्यावी व दिलासा द्यावा असे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविले असता त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी सिन्नर निमाचे पदाधिकारी विशेष आक्रमक दिसले.सिन्नर कार्यालयात चांगले अधिकारी आणि कर्मचारी द्यावेत. कर्तव्यात कसूर करणारे उप अभियंता मनोज पाटील यांची ताबडतोब बदली करावी आदी मागण्यांचा पाऊसही त्यांनी पाडला. सिन्नर औद्योगिक वसाहतीत जे सेक्टर साठी आवश्यक असलेल्या रस्त्या करिता 13.92 हेक्टर औद्योगिक क्षेत्र वगळून रस्ता करण्याबाबत यावेळी विस्तृत चर्चा झाली. अधीक्षक अभियंता झांज्जे यांनी याबाबत तातडीने मुंबईला मुख्य कार्यालयात फोन लावून जमीन विषयक व्यवहार बघणारे महाव्यवस्थापक यांच्याशी झालेला संवादही निमाच्या पदाधिकाऱ्यांना ऐकवला. निमा अध्यक्ष धनंजय बेळे हे सुद्धा या अधिकाऱ्यांशी बोलले.त्यामुळे हा प्रश्न तातडीने सुटेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
सांडपाण्याचा निचरा, विजेचा सातत्याने होणारा लपंडाव,रस्त्यांची दुरवस्था याबाबतही व्यापक चर्चा झाली व ते तातडीने सोडविण्याचे आश्वासनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्याकरता लागणाऱ्या मंजुऱ्या तातडीने देण्यात येतील असेही श्री झांजे यांनी यावेळेस नमूद केले,सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील विविध मूलभूत प्रश्नांबाबतही यावेळी विस्तृत चर्चा झाली. नाले साफसफाई, एमआयडीसीच्या आत्यारीत असलेल्या सोसायटीची साफसफाई व रस्ते दुरुस्ती, सिन्नर येथील अर्धवट असलेली रस्त्याचे कामे पूर्ण करणे व डागजी करणे,सातपूर येथील सिएटचा पूल पाडून ठेवल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत असून त्याबाबत महापालिकेबरोबर बैठक घेऊन लवकर हा प्रश्न निकाली काढावा अशी सूचना निमा पदाधिकाऱ्यांनी केली असता या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन झांज्जे यांनी दिले. निमाच्या कार्यालयात शेजारी असलेल्या डीआयसी कार्यालयाची फ्रंट आणि बॅक साईटच्या भिंती मोठ्या प्रमाणात खचल्या असून त्वरित दुरुस्ती करावी तसेच धोकेदायक वृक्षाकडेही लक्ष देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
चर्चेच्या वेळी उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे,कैलास पाटील, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार,उपअभियंता शशिकांत पाटील, एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयातील सिन्नरचे क्षेत्रीय व्यवस्थापक योगेश पवार,एस.के.नायर आदी उपस्थित होते.