नाशिक (इंडिाय दर्पण वृत्तसेवा) – बालकामगार विरोधी दिनाच्या पुर्वसंध्येस कामगार उपायुक्त कार्यालयाने छापा टाकून दोन बालकामगारांची सुटका केली. या ठिकाणी अल्पवयीन कामगारांकडून अल्पमोबदल्यात बारा तासाहून अधिक श्रमदान करून घेतले जात होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेल मालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
रवीभाई मगनभाई रसाडीया असे हॉटेल मालकाचे नाव आहे. याबाबत दुकान निरीक्षक विशाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक आयुक्त कार्यालयास मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. महामार्गास लागून असलेल्या हॉटेल महाराजा काठियावाडी या ठिकाणी पथकाने पोलीस बंदोबस्तात छापा टाकला असता हॉटेलमध्ये राजस्थान येथील दोन अल्पवयीन कामगार आढळून आले. अल्पवयीन मुलांच्या चौकशीत हॉटेलमालकाकडून अल्पमोबदल्यात बारा तासाहून अधिक तास काम करून घेतले जात असल्याचे तसेच साप्ताहिक सुट्टी न देता त्यांचे आर्थिक मानसिक व शारिरीक शोषण केले जात असल्याचे समोर आले आहे.
मुक्त केलेल्या बाल कामगारांची काळजी व सुरक्षिततेच्यादृष्टीने उंटवाडीरोडवरील बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत. या छाप्यात कामगार अधिकारी नवनित वझरे,दुकान निरीक्षक विशाल जोगी,सुरेश लोहार, महिला व बालविकास विभागाचे हर्षवर्धन पवार,समुपदेशक विजयकुमार माळी तसेच पोलीस नाईक एन.एम.वाघचौरे,ए.ए. देशमुख आदींच्या पथकाने सहभाग नोंदविला.