नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कोण काय करेल हे सांगता येत नाही. आता परराज्यातील मृत व्यक्ती जीवंत असल्याचे भासवून इन्शुरन्स कंपनीस लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे पॉलीसीची सरेंडर प्रक्रिया पार पाडून येथील एका बँकेत जमा झालेल्या सुमारे वीस लाखाच्या रकमेचा भामट्यांनी अपहार केला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स निपॉन या इन्शुरन्स कंपनीचे वासूदेव दिगंबर टिकम (रा.विक्रोळी,मुंबई ) यांनी फिर्याद दिली आहे. हरियाणातील विक्रम सिंग (रा.राधाराणी सिना रोड,आदमपूर) यांनी रिलायन्स निपॉन या इन्शुरन्स कंपनीकडून दोन पॉलीसी काढल्या होत्या. सिंग यांचा मृत्यू झालेला असतांना त्यांच्या मुदतपूर्ण झालेल्या पॉलीसीच्या कागदपत्राच्या आधारे इन्शुरन्स कंपनीला हा गंडा घालण्यात आला.
अज्ञात भामट्यांनी सिंग यांचे खोटे कागदपत्र सादर करून पॉलीसी धारक जीवंत असल्याचे भासवून ही फसवणुक केली. त्यासाठी गंगापूररोडवरील कॅनरा बँकेच्या शाखेत बनावट खाते उघडण्यात आले. इन्शुरन्स कंपनीने कागदपत्राच्या आधारे दावा पूर्ण करून १९ लाख ३८ हजार ८०४ रूपयांची रक्कम बँक खात्यात वर्ग केली असता या रकमेचा अपहार झाला. कंपनीच्या पडताळणीत ही बाब निदर्शनास आल्याने चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोळंके करीत आहेत.