नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : विश्वास ग्रुप, नाशिक ही संस्था नाशिकमधील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत असून विविध दर्जेदार कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून आपले वेगळेपण निर्माण केले आहे.
याचाच भाग म्हणून शास्त्रीय संगीताला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सूरविश्वास’ या मैफिलीचे आयोजन करण्यात येते. आजपर्यंत 39 मैफिली संपन्न झाल्या आहेत. युवा कलावंतांसाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. यात महाराष्ट्राबरोबरच वाराणसी, कर्नाटक येथील कलावंतांनी गायन केलेले आहे.
‘सूर विश्वास’ चे पुढचे पाऊल म्हणजे ‘कुमार’ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सूरविश्वास कुमारमंच’चा शुभारंभ गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शुक्रवार 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता विश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे होत आहे.
शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ असणार आहे. बहुतांश शाळांमध्ये शास्त्रीय संगीत अर्थात गायन-वादन विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्या शाळांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
दर महिन्याच्या तिसर्या शुक्रवारी ही मैफिल संपन्न होणार आहे. यात जास्तीतजास्त संख्येने सहभागी होण्यासाठी ‘सूरविश्वास’चे संकल्पक विनायक रानडे (9922225777/9423972394), यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक विश्वास ठाकूर, ऋचिता विश्वास ठाकूर यांनी केले आहे.