इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे अडीच वाजता तीन सलाईन लावण्यात आल्या. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची मनधरणी केली. डॉक्टरांनी समजूत काढली. त्यानंतर त्यांनी सलाईन लावून दिले.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते पुन्हा उपोषणाला बसले असून, सरकारकडूनही कुणी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले नाही. दरम्यान, जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली.सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगोडी लावण्याच्या प्रयत्नात आहे. मुद्दामहून डाव खेळत आहे. माया असती, तर सरकारने दखल घेतली असती. सरकारकडून खेळवणे सुरू आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर मराठे चांगला हिसका दाखवतील, असा इशारा त्यांनी दिला.
डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितले असले, तरी उपचार न घेण्याची माझी भूमिका कायम आहे, असे सांगत जरांगे पाटील उपचारास काल रात्रीपर्यंत नकार देत होते. पण, प्रकृती खालावल्याने त्यांना पहाटे अडीच वाजता तीन सलाईन लावण्यात आल्या.