इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबादः तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि बंडी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शाह आणि नड्डा मंगळवारी रात्रीच हैदराबादला आले आहेत. याआधी मंगळवारी ‘टीडीपी’ आणि ‘एनडीए’च्या आमदारांनी नायडू यांची नेता म्हणून निवड केली. राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी नायडू यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानंतर नायडू यांनी राजभवनात नझीर यांची भेट घेतली. नायडू विजयवाडाच्या बाहेरील केसरपल्ली येथील गन्नावरम विमानतळासमोरील मेधा आयटी पार्कजवळ शपथ घेतील. नायडूंसोबत इतर नेतेही शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यात जनसेना प्रमुख पवन कल्याण आणि ज्येष्ठ नेते एन. मनोहर, नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि टीडीपी आंध्र प्रदेशचे नेते अचेन नायडू यांचा समावेश असू शकतो.
पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत १७५ जागा आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २६ मंत्री असू शकतात. नायडूंसह २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.