मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेप्रमाणेच ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागा परस्पर घोषित केल्याने काँग्रेसने प्रचंड नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना विधानपरिषदेचे उमेदवार मागे घ्या, असा निरोप दिला आहे.
महाविकास आघाडीत उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी घटक पक्षाशी चर्चा करायला हवी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मुंबईतून विधान परिषदेसाठी अर्ज भरलेले उमेदवार ठाकरे यांनी कायम ठेवावेत; मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार मागे घ्यावेत, असा निरोप पटोले यांनी ठाकरे यांना दिला आहे. चारही ठिकाणी चर्चा न करताच उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमधे नाराजी आहे.
ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त आहेत. पटोले म्हणाले, की ठाकरे लंडनमध्ये होते, त्या वेळी त्यांना फोन केला. त्याचवेळी मी त्यांना दोन जागा तुम्ही लढा, दोन जागा मी लढतो, असे सांगितले होते. त्या वेळी त्यांनी तुमचे उमेदवार कोण आहेत, असे विचारल्यानंतर मी उमेदवारांची नावे सांगितली.
चर्चा करून जागावाटप केले असते, तर चारही जागा निवडून आणणे सोपे झाले असते. मी त्यांना वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या मनात नेमके काय आहे हेच कळत नाही, असे सांगून पटोले म्हणाले, की आम्ही मुंबईत उमेदवार दिले नाहीत. त्यांनी परस्पर त्यांचे उमेदवार जाहीर केले. कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मुंबईची जागा काँग्रेस ठाकरे गटाला सोडण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.