नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी (दि.१०) वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. त्यात ४८ वर्षीय इसमासह एका २१ वर्षीय तरूणाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
नांदूरनाका भागात राहणा-या श्याम परसराम देवरे (४८ रा.निसर्गनगर) या इसमाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराबाहेर लोखंडी जीन्याला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
दुसरी घटना फुलेनगर येथे घडली. प्रकाश सुरेश तुंबळे(२१ रा.पाण्याच्या टाकीजवळ,फुलेनगर) या युवकाने सोमवारी आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच बहिण उमा मानभाव यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.