इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून थेट बारामतीचा दादा बदला अशी मागणी मंगळवारी करण्यात आली. पवार यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांचे नाव पुढे करून अजितदादांविरोधात उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्यातून मार्ग काढीत आहेत. या पार्श्वभूमीवर एक नवीन चेहरा बारामतीसाठी द्यावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार यांनी आताच उमेदवारीची चर्चा करू नका, लवकरच निर्णय होईल. संयम ठेवा, असा सल्ला दिला.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी बारामतीमध्ये ‘वादा तोच दादा नवा’ या आशयाचे बॅनर झळकले होते. त्यावर युगेंद्र यांचा फोटो होता. युगेंद्र हे अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. खा. सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी त्यांचे अभिनंदन करताना सुपे येथे लावलेल्या बॅनर्सवर ‘वादा तोच दादा नवा’ असे लिहिले आहे.