इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या कथित गैरप्रकार प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी NTAला नोटीस जारी केली आहे. परीक्षेची पवित्रता प्रभावित झाली आहे. त्यामुळे याबाबत NTAने उत्तर दिलं पाहिजे. एनटीएला उत्तर द्यावं लागेल, असं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास कौन्सिलिंगला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी आता ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाने NTA ला नोटीस दिली असून या प्रकरणातील यापूर्वीच्या याचिकाही या सोबतच विचारात घेतल्या आहेत.
‘नीट’ परीक्षेचा निकाल चार तारखेला लागला. त्यात ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० मार्क पडले. ‘नीट’ परीक्षेची रचना पाहता असा निकाल लागणे शक्य नसल्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी व पालक करीत आहेत. नीट परीक्षेचा पेपर लिक झाल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुण्यातील कार्यकर्तेही नीट परीक्षेतील गोंधळामुळे आक्रमक झाले होते. त्यांनी शहरातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर आंदोलन केले. त्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी केली. निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरले. तर काही विद्यार्थ्यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.