इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः सगे सोयरे कायद्याची सरकारने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्यांची प्रकृती आता खालावत चालली आहे. त्यांनी उपचार घेण्यास ठाम नकार दिला आहे. आजपर्यंत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित पाच खासदारांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
आमदार राजेश टोपे यांनीही जरांगे यांची भेट घेतली, ते म्हणाले, की मराठा समाजाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार आहे. मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतीमधील कामे उरकल्याशिवाय समाज बांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये, असा सल्ला जरांगे यांनी दिला. दरम्यान, डॉ. अनिल वाघमारे यांनी जरांगे पाटील यांची नियमित तपासणी केली. सध्या त्यांचा रक्तदाब स्थिर आहे; मात्र शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती ढासाळू शकते, अशी भीती डॉ. वाघमारे यांनी व्यक्त केली. ओआरएस किंवा सलाइन घेण्याची विनंती आम्ही केली; परंतु त्यांनी त्यास नकार दिला, असे ते म्हणाले.