इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून ही भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवार यांनी पुन्हा एकदा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८५ आमदार निवडून आणण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी मेळावा अहमदनगर येथे झाला. या वेळी शक्ती प्रदर्शन करण्यात आले. विविध वक्त्यांच्या भाषणात विधानसभेच्या निवडणुकीत ८५ आमदार निवडून आणण्याचा सूर आळवण्यात आला. पवार म्हणाले, राजकीय पक्षात एकमेकांवर टीका करताना मर्यादा पाळायची असते; पण माझ्या मी भटकती आत्मा असा उल्लेख मोदी यांनी केला. ते एका दृष्टीने बरोबर आहे, कारण कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. निवडणुकीच्या काळात ते भारताचे नव्हे, तर मोदींचे सरकार किंवा मोदी गॅरंटी म्हणायचे; परंतु आता मोदी गॅरंटी राहिली नाही. लोकशाहीच्या जोरावर मोदींना हे भारत सरकार आहे, असे सांगावे लागले आहे, असे पवार म्हणाले.