मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करणार नाही, असे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
या बैठकीत ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढताना आपण भाजपला हरवू शकतो, हे दाखवून दिले आहे. दिल्लीश्वरांना यातून आपण एक धडा दिला आहे. आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन ठाकरे त्यांनी केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सामान्य शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर मी राज्यभर दौरा करणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करू, असे यांनी सांगितले.
राज्यातील २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करून ताकदीने कामाला लागा, अशा सूचना ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अनिल परब आदी उपस्थित होते. या वेळी येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडीला १८० ते १८५ जागा जिंकून देऊ, असा निर्धार करण्यात आला.