नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२२ मध्ये सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सन २०२२ ते २०२४ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले. सलग दोन वर्षाच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर ५० विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी दि. २६ मे रोजी जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यापैकी ७ विद्यार्थी हे जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, यामध्ये ५ मुली व २ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी विडिओ कॉलद्वारे संवाद साधून या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले.
सुपर ५० उपक्रम २०२२ च्या बॅचची नुकतीच सांगता झाली या बॅचमधील २२ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जेईई ऍडव्हान्स परीक्षा दिली होती. यातील अश्विनी सुभाष बोरसे (AIR ९६८), डिंपल अशोक बागूल (AIR १०१०), हर्षदा संजय वाटणे(AIR २२६३), आकांक्षा विनोद शेजवळ (AIR २९९३), मंगेश कृष्णा इंपाळ (AIR ३०४२), सागर मनोहर जाधव(AIR ३०४७), वृषाली जनार्दन वाघमारे (AIR ६१८९) या विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांचे आयआयटीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे सर्व विद्यार्थी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असून काही विद्यार्थ्यांचे आई-वडील मोलमजुरी करतात तर काही विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थिती हलाखीची त्यात उच्च शिक्षणाविषयी सुयोग्य मार्गदर्शनाचा अभाव या सगळ्यावर मात करत सुपर ५० उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या यशाला गवसणी घातली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज दि. १० रोजी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. पुढील काळात एडमिशनसाठी ऑप्शन फॉर्म कसे भरावे यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यात येणार असल्याचे सांगत पुढील ४ वर्ष कशा प्रकारे अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले अनुभव कथन केले, यामध्ये *देवळा येथील विठेवाडी गावातील विद्यार्थिनी अश्विनी बोरसे हिने माहिती देतांना आई वडील शेती करतात, मला लहानपनापासून शिक्षणाची आवड आहे, कुटुंबीयांना आधी परीक्षांबद्दल माहिती नव्हती सर्वप्रथम मी नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, त्यानंतर सुपर ५० निवड परीक्षा उत्तीर्ण झाले, जसं जसं मी परीक्षा देऊ लागले तसे घरच्यांचे प्रोत्साहन वाढले, जेईई ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन आता आयआयटीमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.
सुरगाण्यातील पळसन येथील सागर जाधव या विद्यार्थ्याने माहिती देतांना सांगितले की माझे आई वडील हे मजुरी करतात, कौटुंबिक परिस्थिती बिकट असतांना सुपर ५० उपक्रमामुळे आयआयटीयन बनण्याचे स्वप्न पहिले आणि ते आज पूर्ण होतंय, भविष्यात खूप शिकून मला आई वडिलांना ते करत असलेल्या कष्टातुन मुक्त करायचंय असे त्याने सांगितले. पेठ तालुक्यातील चाफ्याचापाडा येथील मंगेश इंपाळ या विद्यार्थ्याने सांगितले की माझे पहिली ते ७ शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालंय, त्यानंतर मी ८ वी ते १० चे शिक्षण शासकीय आश्रमशाळेत घेतले. सुपर ५० प्रवेश परीक्षेविषयी माहीती मिळाल्यानंतर मी परीक्षा उत्तीर्ण होऊन माझी निवड झाली, आई वडील शेतकरी आहेत त्यामुळे घरच्यांनी फक्त चांगले शिक्षण घे असे सांगितले, भविष्यात मला अधिकारी व्हायचंय त्यासाठी आतापासूनच अभ्यास सुरू करतोय, सुपर ५० उपक्रमामुळे मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इतके मोठे यश संपादन करू शकलो असे म्हणत प्रशासनाचे आभार मानले.* यावेळी गट विकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, गट शिक्षणाधिकारी डॉ.मिता चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.