इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः मोदी सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अवघ्या एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आल्यामुळे निराशा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने बॅनर लावून शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या बॅनरमुळे ‘एनडीए’च्या गोटात खळबळ माजली आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर एका अज्ञात व्यक्तीने शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे एक बॅनर लावले आहे. या बॅनरवर शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा. महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील करा, असा सूचक मजकूर या बॅनरवर नमूद करण्यात आला आहे. त्यावर महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेनाप्रेमी असा उल्लेख आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये लोकसभेच्या चार जागा जिंकणाऱ्या लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांना भाजपने कॅबिनेट मंत्रीपद दिले. अवघा एक खासदार असणाऱ्या ‘हम’ पक्षाच्या जीतनराम मांझी यांना एक कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. शिंदे गटाची बोळवण केवळ राज्यमंत्रिपदावर करण्यात आल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची चर्चा सुरू आहे. त्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.