नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झायलो चालकाचा मृत्यू झाला. लघूशंकेनंतर चालक रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आपल्या वाहनात बसत असतांना हा अपघात झाला. महामार्गावर झालेला हा अपघात इतका भयंकर होता की, चालक काही अंतर फुटबॉल सारखा फेकला गेला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नासिर रहिमुल्ला खान (४२ रा.गोवंडी गौतमनगर,सोनापूररोड मुंबई) असे मृत झायलो चालकाचे नाव आहे. खान
रविवारी (दि.९) रात्री आपल्या मित्रांना सोबत घेवून चाळीसगाव येथे देवदर्शनासाठी जात असतांना हा अपघात झाला. मुंबई कडून मालेगावच्या दिशेने जाणा-या एमएच ०४ एएस ९१५१ या झायलो वाहनातून सर्व मित्र प्रवास करीत असतांना खान वाहन चालवित होते. महामार्गावरील मेडिकल चौफुली परिसरातील साईकृपा होलसेल टेक्सटाईल्स भागात रात्री एक च्या सुमारास सर्व मित्र लघूशंकेसाठी थांबले असता ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनात सर्व मित्राना बसवून खान चालकाच्या आसनाकडे जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात झायलोच्या दरवाजासह ते दहा ते बारा फुट उचावर फुटबॉल सारखे फेकले गेले. अन्य मित्रांना काही कळण्याच्या आत हा प्रकार घडला. मित्रांनी धाव घेत त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता अडिचच्या सुमारास वैद्यकीय सुत्रांनी तपासून झायलो चालक खान यांना मृत घोषीत केले. दरम्यान अज्ञात वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी आबताफ तालीबअली शेख (रा.मुंब्रा ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मगर करीत आहेत.