इंडीया दर्पण ऑनलाईन डेस्क –
आज जायन्ट किलर ठरलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने चेन्नईत पाकिस्तानचा ८ विकेटस राखून अतिशय मानहानीकारक पराभव केला आहे. आधी विश्वचषक जिंकण्याची पोकळ गर्जना करीत आलेल्या पाकिस्तानला आता मात्र ३ पराभवानंतर नॉकआउट फेरी गाठण्यासाठीचे आव्हान देखील कठीण झाले असून उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान आपला दबदबा कायम राखण्यासाठी तरी पाकिस्तानला मोठी अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे. वन-डे इतिहासात हा अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुध्द हा पहिला विजय आहे. इतकेच नव्हेत तर २८२ या मोठया धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम देखील या संघाने आज करुन दाखवला.
पाकिस्तानने टॉस जिंकला खरा परंतु, दुस-या डावात धावांचा पाठलाग करण्याची अफगाणिस्तान संघाची क्षमता बाबर आझमला ओळखताच आली नाही. त्यांनी फलंदाजी स्विकारली आणि तिथेच पाकिस्तानच्या पराभवाची पहिली पायरी रचली गेली. पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक याने ७५ चेंडूत ५८ धावांची संथ खेळी केली. तिकडे कर्णधार बाबर आझम हा देखील धावांसाठी झुंज देतो आहे. त्याच्या धावा होत नव्हत्या. त्यामुळे त्यानेही ७४ धावा करण्यासाठी ९२ चेंडू खर्ची घातले आणि वैयक्तीक धावांच्या बाबतीत एक चांगली खेळी केली. परिणाम असा झाला की केवळ ७ विकेट गमावलेल्या असतांना देखील धावफलकावर ५० षटकात केवळ २८२ धावा नोंदविता आल्या.
पाकिस्तानच्या मुख्य फलदांजानी स्वत:चा स्ट्राईक रेट चांगली राखली असती तर कदाचित इथे ३०० धावा होवू शकल्या असत्या आणि अफगाणसंघाला त्या जड गेल्या असत्या. परंतु, आधी स्वत:साठी खेळण्याचे पाकिस्तानच्या फलंदाजांचे डावपेच त्यांच्याच अंगलट आले. ही धावसंख्या गाठतांना रहमानउल्लाह गुरबाज (६५ धावा) इब्राहिम जदरान (८७ धावा), रहमत शाह (७७ धावा) आणि हशमतउल्ला शहिदी (४८ धावा) या सगळयाच फंलदाजांनी या विजयात त्यांचा त्यांचा वाटा उचलला. याउलट, पाकिस्तानच्या गोलंदाजांची देहबोली सुरूवातीपासूनच निगेटीव्ह मोडमध्ये दिसून आली आणि त्याचा फायदा अफगाणिस्तानच्या जांबाज फलंदाजांनी उचलला.
यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे ‘सितारे’ ‘बुलंद’ व्हायला तयार नाहीत. आधी ऑस्ट्रेलिया, नंतर भारत आणि आता अफगाणिस्तान ….. अवघ्या ५ सामन्यात मिळालेल्या या ३ पराभवांनी अंकतालिकेत पाकिस्तानची घसरगुंडी झाली असून आता किमान ‘लाज बची तो लाखो पाये’ या उक्तीनुसार उरलेल्या सामन्यात पाकिस्तानला स्वत:चे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी लढावे लागणार आहे. महत्वाची बाब अशी आहे की, पाकिस्तानचे द. आफ्रिका, बांग्लादेश, न्युझीलंड आणि इंग्लड या बलाढ्य संघासोबतचे सामने अद्याप बाकी आहेत.
दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न घेवून आलेला नाही. परंतु, आता ‘जायन्ट किलर’ बनण्याची या संघाची इच्छापुर्ती झाली आहे हे नक्की. आधी विश्वविजेत्या इंग्लडला ६९ धावांनी आणि आता पाकिस्तानला तब्बल ८ विकेटसने पराभूत केल्यानंतर या जायन्ट किलर संघाने अशी काही स्वप्न बघायला सुरूवात केली तर तो त्यांचा हक्क असणार आहे. अफगान संघाचे श्रीलंका, नेदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया आणि द.आफ्रिका या संघासोबतचे सामने बाकी आहेत. या विश्वचषकात आजपावेतो शेवटच्या चेंडूपर्यन्त धडकन वाढविणारे सामने भलेही झाले नसतील परंतु अपेक्षेपेक्षा मोठा उलटफेर करणारे ३ सामने आजपावेतो झालेले असल्याने पुढे काहीही होवू शकते असे गृहीत धरायला हरकत नाही.
आता उद्या मुंबईत बांग्लादेश विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होईल.