नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापारेषणच्या एकलहरे येथील २२०x३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ५०x३ (१५० एमव्हीए) क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर यामध्ये एका पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये ६जून रोजी आणि उर्वरित २ ट्रान्सफॉर्मरमध्ये सोमवारी सकाळी एकाचवेळी बिघाड झाल्याने या महापारेषणच्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होणारी नाशिक रोड भागातील महावितरणची उपकेंद्रे सोमवारी पहाटे प्रभावित झाल्याने वीज पुरवठा बंद झाला. मात्र या बाधित उपकेंद्रातील वीज भार व्यवस्थापन करून महावितरण पर्यायी स्त्रोतामधून मागणीनुसार टप्याटप्याने वीज पुरवठा करणार असून ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
एकलहरे येथील महापारेषणच्या या विद्युत उपकेंद्रातून महावितरणच्या पंचक, मुक्तिधाम, देवळाली, भगुर, एकलहरे व सामनगाव या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राना पुरवठा केल्या जातो. मात्र यामधील एक ट्रान्सफॉर्मर दिनांक ६ जून रोजी आणि उर्वरित २ ट्रान्सफॉर्मरमध्ये सोमवारी सकाळी एकाचवेळी झालेला बिघाड ही अनपेक्षित घटना आहे. त्यामुळे एकलहरेच्या अति उच्च दाब उपकेंद्रातून मिळणारा वीजपुरवठा पर्यायी इतर महापारेषणच्या व महावितरणच्या उपकेंद्रातून बॅक फिडींग करून पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवळपास वीस मेगावॉट क्षमतेचे भार व्यवस्थापन करून गरजेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करून उपकेंद्रातील वाहिन्यांना टप्याटप्याने वीज पुरवठा करणार आहे.
महापारेषण यांनी कळविल्याप्रमाणे पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलाच्या कामाची व्याप्ती जास्त असल्याने ४८ ते ७२ तासाचा अवधी लागू शकतो. या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. तरी या काळात बाधित भागातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.