नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इलेक्ट्रीकचे काम करणा-या तरूणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या जाळय़ात अडकवीत युवतीस वेळोवेळी लॉजवर घेवून जात संशयिताने हे कृत्य केल्याने मुलगी गर्भवती राहिली असून त्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश नानाजी गोसावी (रा.पिंगळेनगर,हिरावाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सिडकोतील उपेंद्रनगर भागात राहणा-या अल्पवयीन पीडितेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित इलेक्ट्रीशनचे काम करतो. डिसेंबर २०२३ मध्ये मुलीच्या घरात वायरींगचे काम करण्यात आले. यावेळी त्याची मुलीशी ओळख झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने हा प्रकार घडला.
संशयिताने गेल्या सहा महिन्यात मुलीस वेगवेगळी आमिष दाखवून पंचवटीतील लक्ष्मी लॉज येथे घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून तिला अचानक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबियांने दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.