इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७१ खासदारांचा केंद्रीय मंत्रीचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. पण, यात शिंदे गट कामालीचा नाराज झाला असून त्यांचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करुन आमच्या बाबत दुजाभाव झाल्याचे सांगितले.
या नाराजी बाबत बोलतांना ते म्हणाले की, चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. एक खासदार असणा-या मांझी यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. कुमारस्वामी यांना दोन खासदार असताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. आम्हालाही कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे होते. शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार असताना कॅबिनेट न दिल्यामुळे दुजाभाव झाल्याचे त्यांनी सांगितले.
काल राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांच्या खासदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. आज शिंदे गटाची नाराजी समोर आली आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार दिला आहे. तर अजित पवार गटालाही स्वतंत्र प्रभार देण्याचे सांगितले होते. पण, त्यांनी नकार दिला. आता या नाराजीवर पुढे काय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.