इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळमधील भाजपचे खासदार सुरेश गोपी यांनी काल केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली. गोपी हे केरळमधील भाजपचे एकमेव व पहिले खासदार आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा पराभव करुन ते निवडणून आले. ते चित्रपट अभिनेता असून त्यांनी अनेक चित्रपट साईन केल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी व पूर्णवेळ खासदार म्हणून काम करण्यासाठी त्यांनी केंद्रीय पद सोडण्याची मानसिकता बनवली आहे.
एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी मंत्रिपद मागीतले नव्हते. एक खासदार म्हणून काम करणं हा माझा हेतू आहे. मला मंत्रिपदाची गरज नाही असं मी सांगितलं होतं. मला वाटतं मी लवकरच या पदावरून मुक्त होईल. त्रिशूरच्या मतदारांनाही त्याची काही अडचण नाही. मला कोणत्याही परिस्थितीत माझे अर्धवट सिनेमे पूर्ण करायचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहे. याअगोदर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. २०२२ पर्यंत त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ होता.
अशी आहे अभिनेता म्हणून कारकिर्द
सुरेश गोपी यांनी बालकलाकार म्हणून सिनेमात काम सुरू केले होते. अनेक सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये आलेल्या कलियाट्टम सिनेमातील कामाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय एका टीव्ही शोचे होस्ट म्हणूनही ते काम पाहत आहेत.