इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामतीःलोकसभेच्या निकालानंतर बारामतीमध्ये पवार विरुध्द पवार वाद शमण्याचे चिन्ह नाही. आता तर युगेंद्र पवार यांचे बारामतीचा नवीन दादा असे म्हणणारे बॅनर झळकले आहे. या बँनरवर ‘वादा तोच दादा नवा’ असा उल्लेख करून युगेंद्र पवार यांचा फोटो लावल्यामुळे त्याची चर्चा अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांचा चौथ्यांदा प्रचंड मतांनी विजय झाल्याने अजितदादांनाच डिवचण्यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
युगेंद्र हे अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. सुळे यांच्या विजयानंतर सुपे येथे बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर ‘वादा तोच दादा नवा’ असा उल्लेख करून युगेंद्र पवार यांचा फोटो लावला आहे. “हर वाल का पलटवार हुं मै, युही नही कहलाता शरद पवार हूँ मै ” असे वाक्य शरद पवार याच्याबद्दल लिहून सुळे यांच्या चौथ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
दरम्यान, हे बॅनर्स झळकल्यानंतर युगेंद्र बारामती विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून त्यांना बारामतीच्या राजकारणात सक्रिय केले जात असल्याची चर्चा आहे.








