इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – विरोधी आघाडी जो विचार करत आहे, त्याच्या अगदी उलट चाल खेळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ओळखले जाते. आता मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही भाजप गनिमी कावा करून विरोधकांना सरप्राईज करण्याच्या तयारीत आहे.
या तिन्ही राज्यांमधील विधानसभा या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. यात मध्यप्रदेशात सत्ता पुन्हा आपल्याकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये गतवैभव प्राप्त करण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र ज्या गनिमी काव्याने विरोधकांना धक्का देण्याची भाजप श्रेष्ठींची तयारी सुरू आहे, त्या धक्क्याने पक्षातीलच अनेक नेत्यांवर घरी बसण्याची वेळ येईल, असे दिसत आहे. मध्यप्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पत्ता जवळपास कट झालेला असल्याचे त्यांच्याही लक्षात आलेले असावे. कारण त्यांना निवडणुकीची उमेदवारी मिळेल की नाही, येथपासून चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे, राजस्थानमध्ये निवडणुकीची टीम जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना सामील करून घेतले नव्हते. आताही त्यांचे नाव अधिकृतरित्या यादीत नाहीच. पण वसुंधरा राजेंनी दिल्लीत जाऊन भेटी घेतल्यानंतर त्या निवडणुकीत प्रचार करतील, एवढीच घोषणा करण्यात आली. त्यामुळे त्यांना तिकीट मिळाले तरीही त्या मुख्यमंत्री नसतील, हे निश्चित आहे. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती आहे. तिथेही राजस्थान आणि मध्यप्रदेशचा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना कायमचे माजी करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यांच्याकडे निवडणुकीत जबाबदारी दिली गेली तरीही ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसतील, हे जवळपास निश्चित आहे.
मुख्यमंत्री बदलाबरोबर इतर राज्यात चेहरे बदलणार
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमण सिंह हे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे नसतील, असे स्पष्ट संकेत भाजपने दिले आहेत. त्यांच्या ऐवजी दुसरा पर्याय शोधण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्रातील एखाद्या दिग्गज नेत्याला राज्यात परत पाठवून मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असाही अंदाज व्यक्त होत आहे.
पक्षांतर्गत धुसफुस
भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या बाबतीत घेतलेले निर्णय अनेकांना पटलेले नाही. विशेषतः वसुंधरा राजेंना निवडणुकीच्या जबाबदारीतून बाजुला ठेवणे, मध्यप्रदेशात तीन केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी देऊन शिवराजसिंह चौहान यांना संकेत देणे यामुळे भाजपमध्ये पक्षांतर्गत धुसफुस वाढलेली आहे, हेही तेवढेच खरे.
Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh elections… BJP will give many big blows