इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर मंत्री सुध्दा शपथ घेणार आहे. यात रावेर लोकसभा मतदार संघातून तिस-यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे या मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांच्यामुळे उत्तर महाराष्ट्रात मंत्रीपद मिळणार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे दिल्लीत रवाना झाले आहे.
गेल्या पाच वर्षात एकनाथ खडसे यांना राजकारणात अनेक धक्के बसले. पण, त्यांच्या सूनेला केंद्रीय मंत्रीपद मिळणार असल्यामुळे आता त्यांचे राजकीय वजन वाढणार आहे. जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांना भाजपच्या या निर्णयामुळे धक्का बसणार आहे.
रक्षा खडसे यांच्याबरोबरच राज्यातून भाजपतर्फे नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, शिंदे गटातर्फे प्रतापराव जाधव, रिपाइंचे रामदास आठवले यांची नावे केंद्रीय मंत्रिमंडळात निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या सर्वांना शपथविधीचा फोन गेला आहे.
मोदीं यांच्यासह कोण कोण मंत्री पदाची शपथ घेवू शकतात याची चर्चा शनिवारी दिवसभर होती. त्यानंतर आता फोन आल्याच्या बातम्या येत आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आलेला नाही. त्यामुळे या गटातर्फे कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.