इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधींना पार पाडण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ते म्हणाले की, राहुल गांधी तयार आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही कारण राहुल गांधींनी एकदा अध्यक्षपद सोडले होते. तेव्हा काँग्रेस पक्षाला एका संकटाचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत मोठा पराभव झाला. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले. काँग्रेसने जाणीवपूर्वक समाजात फूट पाडण्याचे काम केले. पण, २०२९ च्या निवडणुकीत आमची कामगिरी इतकी चांगली असेल की विरोधकांनाही बोलण्याची संधी मिळणार नाही. राहुल गांधींचे नाव ठरले आहे, पण हे पद स्वीकारायचे की नाही हे त्यांच्या हातात आहे. असे ते म्हणाले..
लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. मावळकर यांच्या काळात करण्यात आलेल्या नियमांनुसार विरोधी पक्ष नेत्याचे पद लोकसभेतील सदस्य संख्येच्या किमान दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला दिले जाते. सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षाच्या वतीने प्रस्ताव सादर करत सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला हा दर्जा देऊ शकतो. जनता पक्षाच्या सरकारने १९७७ मध्ये संसदेत या पदास संवैधानिक दर्जा दिला. लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.
काँग्रेसला २०१४ मध्ये ४४, २०१९ मध्ये ५२ जागा मिळाल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यावेळेस काँग्रेसची सदस्य संख्या दहा टक्क्यांच्या कमी असल्याने त्यांना विरोधी पक्षनेत्याचा दर्जा दिला नव्हता. काँग्रेस सरकारच्या काळात १९८४ मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते.