नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक व्यवहारात परिचीताने एकाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ८० लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याने ४५ वर्षीय व्यक्तीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दूल कादिर अहमद शेख (रा.वडाळागाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नासीर हमीद शेख (४५ रा.ग्रिनरूफ बंगलो,सारडा सर्कल) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित अब्दूल शेख व फिर्यादी नासीर शेख एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात आर्थिक व्यवहार आहेत संशयिताने २०१३ मध्ये नासीर शेख यांच्याकडून प्लॉट डेव्हलप करण्यासाठी ८० लाख रूपयांची रोकड हात उसनवार घेतली होती. त्यानंतर ही रक्कम परतही करण्यात आली.
याव्यवहारा दरम्यान केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही फसवणुक करण्यात आली. व्यावसायीक गाळे खरेदी विक्री व्यवहारात पैसे घेतल्याचे भासवून त्याने बनावट कागदपत्राच्या आधारे नासीर शेख यांना पोलीसात खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ८० लाख रूपयांची मागणी केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.