इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली-सराटी गावात ते उपोषणाला बसले आहेत. सरकार परवानगी नाकारत असले, तरी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत आपण आंदोलन करणारच, असे ठणकावून सांगत त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
अंतरवाली-सराटी गावात उपसरपंचासह दीडशे लोकांनी उपोषणाला विरोध केला होता. आता अंतरवाली सराटी गावातील सर्व जाती धर्माच्या साडेनऊशे लोकांनी पाठिंबा देणाऱ्या सह्या दिल्या असल्याचे निदर्शनास आणून गावातील लोकांचा विरोध संपला असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. विरोध होतच असतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप यांनाही विरोध झाला होता, असे त्यांनी सांगितले.
आम्ही आंदोलन सुरू केले, तेव्हा ओबीसींनी सहभाग घेत आंदोलन केले, तो विरोध होताच असे सांगून जरांगे यांनी आपले आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असून, माझे इमान समाजाशी आहे, अशा शब्दात आपली भूमिका मांडली. उपोषणाला कोणते आमदार पाठिंबा देतात आणि कोण नाही, यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमदारांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करावी. आमच्या उपोषणाला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना गरीब मराठे कायमचे घरी पाठवणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.