इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ९ जून रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपीनीयतेची शपथ देणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवन येथून देण्यात आली. याअगोदर ६ वाजता हा शपथविधी होणार असल्याचे बोलले जात होते. पण, आता हा शपथविधी सायंकाळी ७.१५ वाजता निश्चित करण्यात आला आहे.
एनडीएच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
भारतीय जनता पार्टी (भाजप) चे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी २.३० वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याचे पत्र सुपूर्द केले. एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आली. शिष्टमंडळातील इतर सदस्यात भाजपचे राजनाथ सिंह, अमित शहा, अश्विनी वैष्णव आणि डॉ. सी.एन. मंजुनाथ; तेलुगु देसम पक्षाचे एन. चंद्राबाबू नायडू; जनता दल (संयुक्त) चे नितीश कुमार, राजीव रंजन सिंग (ललन सिंग) आणि संजय झा; शिवसेनेचे एकनाथ शिंदे; जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे एच.डी. कुमारस्वामी; लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे चिराग पासवान; हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) चे जीतन राम मांझी; जनसेने चे पवन कल्याण; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार; अपना दल (सोनेयलाल) च्या अनुप्रिया पटेल; राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी; युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल चे जोयंता बसुमतारी; असम गण परिषदेचे अतुल बोरा; सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे इंद्र हँग सुब्बा; ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे सुदेश महतो आणि चंद्र प्रकाश चौधरी; आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे रामदास आठवले यांचा समावेश होता.
मिळालेल्या पाठिंब्याच्या विविध पत्रांच्या आधारे निवडणूकपूर्व काळातील सर्वात मोठी आघाडी असलेली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी, नव्याने स्थापन झालेल्या १८ व्या लोकसभेत बहुमताने पाठींबा प्राप्त करण्याच्या आणि एक स्थिर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचे नोंदवत आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ७५ (१) नुसार त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून नरेंद्र मोदी यांची भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ सूचित करण्याची विनंती केली आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या इतर व्यक्तींच्या नावांबाबतही अवगत करण्यास सांगितले.