नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे सुमारे ५४ हजार रूपये किमतीचे पाच मोबाईल चोरून नेले. ही घटना राजपाल कॉलनीत घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप जयदेव बोरसे (मुळ रा. शहादा जि.नंदूरबार हल्ली तेजश्री अपा.राजपाल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. बोरसे यांच्यासह पाच विद्यार्थी राजपाल कॉलनीतील तेजश्री सोसायटीत वास्तव्यास आहेत. बुधवारी (दि.५) सकाळी सर्व मित्र महाविद्यालयात जाण्याची तयारी करीत असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून हॉलमध्ये चार्जिंगला लावलेले व टेबलावर ठेवलेले पाच मोबाईल चोरून नेले. अधिक तपास उफनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात ३१ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज भिकनराव खरोटे (रा.स्वामी विवेकानंदनगर,अशोकनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. खरोटे कुटूंबिय बुधवारी (दि.५) सकाळी अल्पशा कालावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
कोयता बाळगणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील सावतानगर भागात कोयता बाळगणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या अंगझडतीत लोखंडी कोयता मिळून आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतन गणेश भावसार (२१ रा.अष्टविनायक चौक,सुभाषचंद्र बोस गार्डजवळ) व ऋतिक वसंत रकताटे (२३ रा.जे.के.जीम जवळ नम्रता चौक,पाटीलनगर) अशी संशयित कोयताधारींचे नाव आहे.
सावतानगर येथील शनिचौकात थांबलेल्या दोघांकडे धारदार कोयता असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.६) पथकाने धाव घेत संशयितांच्या मुसक्या आवळल्या असता संशयित भावसार याच्या अंगझडतीत कोयता मिळून आला. याबाबत अंमलदार सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.