मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून या निमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच ध्येय ठेवलं असून आपण आता पुढं निघालो आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करुयात असेही मुख्यमंत्री म्हणतात.
‘नऊ दिवस देवी मातेची पूजा केल्यानंतर आता विजयादशमी आली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करतो. सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचं पूजन करण्यात येते.‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं आपण म्हणतो, कारण खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. आपल्या संस्कृतीत विजयादशमीला खूप महत्त्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, दुष्ट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे विजयादशमी आहे. वाईट गोष्टींना दूर करून पुढं जाण्याचा हा क्षण आहे. अज्ञानावर ज्ञानानं, शत्रूवर पराक्रमानं, वैऱ्यावर प्रेमानं विजय मिळवायचा असा हा दिवस आहे.साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर आपण नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करुया, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.