इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत सरकार बनवण्याच्या हालचालीला वेग आला असून आज केंद्रीय सभागृहात NDA च्या संसदीय दलाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पंतप्रधानपदाचा शपथविधी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीत मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांना मांडला. त्यानंतर या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, एचडी कुमारस्वामी, चंद्रबाबु नायडू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी मोदी यांनी निवड झाली.
या बैठकीत प्रवेश करताच नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष भाजपसह एननडीएच्या खासदारांनी केला. तर मोदींनी आधी संविधानाला नमन केले. त्यानंतर त्यानी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी हस्तांदोलन केले.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २२ राज्यांनी एनडीएला सेवा करण्याची संधी दिली. आम्हाला बहुमत मिळालं आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. मात्र देश चालवण्यासाठी सर्वमत खूप गरजेचं असतं. हे मी याआधीही अनेकदा म्हणालो आहे. आपल्या सर्वांमध्ये विश्वासाचा सेतू मजबूत आहे. हा माझ्यासाठी अत्यंत भावूक क्षण आहे. मी तुम्हा सर्वांचे जितके आभार मानू तितकं कमी आहे. विश्वास हीच मोठी संपत्ती आहे. माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. इतक्या मोठ्या समूहाचं स्वागत करण्याची संधी आज मला मिळाली आहे. ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र अथक परिश्रम केला. आज मी त्यांना वाकून नमस्कार करतो असेही ते म्हणाले.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड झाली आहे. राजनाथ सिंह यांच्या मागणीला आमच्या पक्षाकडून पाठिंबा आहे. अनेकांनी देशाच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अफवा पसरवणाऱ्यांना जनतेने नाकारलं आणि मोदी यांना स्वीकारलं असे ते म्हणाले.
या बैठकीत एनडीए आघाडीतील सर्व पक्षाचे नेते खासदार उपस्थितीत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या बैठकीत मानाचे स्थान देण्यात आले.