मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दीडशे जागा लढवणार असल्याची घोषणा गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते म्हणाले की, आता विधानसभेची तयारी करावी लागेल. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दीडशे जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडेतीन महिने गेले. विधानसभा निवडणुकीत इतका वेळ घालून चालणार नाही. महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागेल.
यावेळी ते पुढे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले. याच उत्साहात विधानसभेच्या मैदानात उतरू, असे सांगून ते म्हणाले, की यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव नव्हता. मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव नव्हता. गेल्या निवडणुकीत आम्ही ‘वंचित’मुळे नऊ जागा हरलो होतो.