इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्यामुळे आता त्यातून धडा घेण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. पुढे पराभव टाळण्यासाठी अजित पवार यांच्या गटाने काही मुद्दे मांडले आहे. त्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुद्दा आहे.
अजितदादांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपसमोर मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव राष्ट्रवादी मांडणार असल्याची माहिती मिळाली. अजित पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. लोकसभेतील पराभवाला पक्षांतर्गत नाराजी हे कारण असल्याचे म्हणणे मांडण्यात आले.
राज्यात सत्ता आल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करावा, महामंडळांचे वाटप करावे, विविध शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होऊन एक वर्ष होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील कॅबिनेट खाते रिक्त आहे. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे हे औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद रिक्त झाले आहे. येत्या १५ दिवसांमध्ये शपथविधी आयोजित करून मंत्रिपदे भरण्याची मागणी केली आहे. इतर खात्याच्या राज्यमंत्रिपदांचेही वाटप करा, अशी मागणी अजितदादा गट करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.