नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे अडिच लाखाच्या ऐवज चोरुन नेला. या घरफोडीत एक घरफोडी भरदिवसा करण्यात आली. याप्रकरणी मुंबईनाका आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना आनंदवली येथे घडली. संजय अनंत मराठे (रा.रिजेन्सी टावर,चित्रगंधा कॉम्प्लेक्स जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मराठे कुटुंबिय बुधवारी (दि.५) दुपारी अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ९४ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.
दुस-या घटनेत वडाळागावातील नरेंद्र प्रकाश वणवे (रा.जयमल्हार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पखालरोडवरील विधातेनगर भागात राहणारे अनिता पिंगळे व देविदास पिंगळे हे बहिण मेव्हणे असलेले दांम्पत्य सोमवारी (दि.३) तिर्थयात्रेसाठी जगन्नाथ पुरी येथे रवाना झाले आहे. पिंगळे कुटुंबिय घरी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी फ्रिजमध्ये डब्यात ठेवलेले सुमारे १ लाख ६८ हजाराचे दागिणे चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.५) उघडकीस आली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.