इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीला १८ पेक्षाही जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून सन्यास घेईन अशी जाहीर घोषणा लोकसभा निवडणूक काळात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली होती. पण, निकालानंतर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. त्यानंतर संजय राऊत, किरण माने, सुषमा अंधारे यांनी थेट शेलार यांना त्यांच्या घोषणेची आठवण करुन दिली. आता मनसेतून शिवसेना ठाकरे गटात आलेले कीर्तिकुमार शिंदे यांनी तर फेसबुकवर भली मोठी पोस्ट करत शेलार यांना डिवचलं आहे.
तर बघा शिंदे यांची पोस्ट
प्रति,
मर्दश्री. आशिषजी शेलार,
भाजप नेते, मुंबई.
यांसी जय महाराष्ट्र!
लेच्यापेच्यांच्या महाराष्ट्रीय राजकारणात आपण नेहमीच दाखवत असलेल्या बेधडक मर्दानगीबाबत सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभिनंदन.
नुकताच आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपण म्हणता त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४५ जागा मिळणे अपेक्षित होते. खरंतर महाराष्ट्रात तुम्हाला ५६ जागा मिळायला हव्या होत्या. छप्पन इंच छातीच्या राजकीय विचारांचे तुम्ही महाराष्ट्रातील शिलेदार ना! पण काय करणार? महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच ४८ आहेत. म्हणून ४५ जागा जिंकण्याचा तुमचा मर्दानी आत्मविश्वास योग्यच. तरी प्रत्यक्ष निवडणुकीत तुमच्या पक्षाला ९ तर युतीला १७ जागा मिळाल्या! तुमच्या आत्मविश्वासापेक्षा फक्त ३६/२८ कमी!! देशात ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा देऊन २३८ जागा मिळवणाऱ्या मर्दानी नेत्यांच्या पक्षासाठी हे योग्यच; नाही का?
समजा, महाराष्ट्रात तुम्ही खरंच ४५ जागा जिंकल्या असत्या तर राज्यात तुम्ही कुणालाही राजकारण सोडायला भाग पाडलं असतं. तसंही गेल्या काही वर्षांत तुमच्या पक्ष नेतृत्वाने अनेकांना राजकीय बाजारातून ‘उठवलं’ आहे (पक्षी श्री. अजित पवार) आणि त्याहून अधिक लोकांना राजकीय बाजारातून ‘उठवण्याची भीती’ दाखवून (पक्षी श्री. एकनाथ शिंदे, श्री. अशोक चव्हाण) आपल्या चारित्र्यवान ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या राजकारणात सामावून घेतलं आहे. एखाद्याला राजकारणातून आणि आयुष्यातून ‘उठवण्याचा’ तुमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे. त्याबद्दलही आपलं मनःपूर्वक अभिनंदन.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या त्या भाजपमुळेच; असंही तुम्ही म्हणालात. खरंय! अगदी १०० टक्के सत्य! पण काय करणार; हल्ली लोकांची स्मरणशक्तीच कमी झाली आहे. म्हणूनच तर, १९८९ नंतर “भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेना विस्तारली” हे सत्य नव्या पिढीला आपल्या पक्षाने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगण्याची सध्या नितांत गरज आहे. त्या काळात शिवसेनाप्रमुख तुमच्या पक्षाला ‘कमळराव’ अशी प्रेमाने हाक मारायचे हेसुद्धा तुमच्या ट्रोलर्सनी नव्या उत्साहाने मराठी तरुणांना सांगायला हवं. त्यासाठी गरज पडल्यास काही कोट्यवधी रुपये खर्चून सोशल मीडियाची एक नवीन योजना तुम्ही तयार करायला हवी. “शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी कै. बाळासाहेब ठाकरे हे कै. प्रमोद महाजन यांच्या घरी जाऊन नियमित बसत असत, त्यांची मनधरणी करत” हा नवीन संशोधनावर आधारित इतिहास शिकवणारा धडा आपण शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हवा. मनुस्मृतीपेक्षा हा धडा अधिक महत्त्वाचा आहे. आपण लवकरच त्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागाल याची मला खात्री आहे.
आता आठवणीने सांगायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा : शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही आव्हान दिलं होतं की, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकूण मिळून जरी १८ जागा जिंकता आल्या तर “मी राजकारण सोडेन”!
आशिषजी, मला पूर्ण कल्पना आहे की तुमचा पक्ष आणि स्वतः तुम्ही शब्दाला पक्के आहात. कारण तुमच्यावर संस्कारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. जे सत्य आहे- खरं आहे तेच बोलायचं आणि दिलेला शब्द पाळायचा हाच तुमच्यावर झालेला संघ संस्कार. मोदीसाहेब- शहासाहेब काय आणि फडणवीससाहेब- शेलारसाहेब काय; तुम्ही सर्व शब्दाला पक्के! अस्सल मर्द! एक खरा मर्दच त्याने दिलेला शब्द कधी मागे घेत नाही. मोदीसाहेबांचेच बघा ना; प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचा आपला अतिमौल्यवान शब्द त्यांनी कधीच मागे घेतला नाही! खरं ना?
आशिषजी, तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरण्याची संधी आज तुमच्यासमोर हात जोडून विनवणी करत उभी आहे. मला आशा आहे की, या संधीला तुम्ही मिठीत घ्याल. तुम्ही तुमची लाखमोलाची राजकीय विश्वासार्हता जपाल.
तुम्ही मर्द आहात, आशिषजी.
शब्दाला जागा, आशिषजी.
राजकारण सोडा, आशिषजी.
शुभेच्छांसह धन्यवाद.
आपला नम्र,
कीर्तिकुमार शिंदे