इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची समस्या जवळपास संपूर्ण देशभरात आहे. मोकाट कुत्र्यांची नसबंदी करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यावे. तसेच वाहनांमागे धावणाऱ्या, नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना कोंडवाड्यात ठेवावे, अशी मागणी सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे देशातील एका मोठ्या उद्योगपतीला स्वत:चा जीव गमावण्याची वेळ आली आहे.
भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे एका उद्योगपतीला स्वत:चा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाघबकरी चहा उद्योग समुहाचे संचालक पराग देसाई असे त्यांचे नाव आहे. चहापत्तीच्या ब्रॅण्डमध्ये लोकप्रिय असलेल्या वाघबकरीचे संचालक देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला होता. त्यात त्यांना प्राण गमवावा लागला आहे. देसाई हे ४९ वर्षांचे होते. पराग हे देसाई कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य होते. नारनदास देसाई यांनी १८९२ मध्ये स्थापन केलेल्या कंपनीचा कारभार ते मागील काही वर्षांपासून पाहत होते.
प्राप्त माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर ते दवाखान्यात दाखल होते. पराग यांच्या राहत्या घरासमोर काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांना अहमदाबादच्या प्रल्हादनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. २४ तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने, त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सात दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या देसाई यांची प्रकृती रविवारी उशिरा फारच बिघडली व त्यानंतर त्यांचे निधन झाले.
असा वाढविला व्यवसाय
पराग आणि त्यांचा चुलत भाऊ पारस देसाई हे १९९० च्या दशकात कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. अमेरिकेतील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलेले पराग हे वाघ बकरी टी ग्रुपच्या संचालक मंडळातील दोन कार्यकारी संचालकांपैकी एक होते. ते कंपनीच्या विक्री, मार्केटिंग आणि निर्यातीचे नेतृत्व करत होते. ३० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असणाऱ्या पराग यांच्या कार्यकाळात कंपनीची नेटवर्थ ही १५०० कोटींहून पुढे पोहोचली होती.