इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सहस्रताल पर्वतावर गेलेल्या नऊ गिर्यारोहकांचा थंडीने गोठून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या नऊ पैकी पाच जणांचे मृतदेह मिळाले असून उर्वरित चौघांच्या मृतदेहांचा शोध राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक करत आहे. वाचलेल्याना एअरलिफ्ट करून डेहराडून आणि भटवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे १५ हजार फूट उंचीवर हे गिर्यारोहक गेले होते.
हे २२ गिर्यारोहक चार जून रोजी डोंगरांनी वेढलेल्या एका छोटाशा तलावाजवळ होते. त्यात कर्नाटकातील १८, महाराष्ट्रातील एक व तीन स्थानिक मार्गदर्शक होते. केवळ टीम लीडरवर विसंबून ते हिमालयात इतक्या उंचीवर गेले होते. निमच्या द्रौपदी का दांडा येथे २०२२ मध्ये झालेल्या हिमस्खलनानंतरची ही मोठी दुर्घटना आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्य आपत्ती निवारण दल आणि प्रशासन गिर्यारोहकांना वाचवण्यसाठी प्रयत्न करीत होते. चौघांचा अगोदरच मृत्यू झाला होता.त्यानंतर आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. हवामान बिघडल्याने गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.