इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसाच्या नावाखाली अनेक प्रकारची उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. अन्न सुरक्षा नियामक ‘एफएसएसएआय’ ने सर्व कंपन्यांना कॅन केलेला उत्पादनांवर शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसाचा दावा करू नये असे निर्देश दिले आहेत.
कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे विपणन आणि जाहिरात करतानाही असे दावे टाळावे लागतील. ‘एफएसएसएआय’ ने सर्व ‘फूड बिझनेस ऑपरेटर्स’ना (एफबीओ) या संदर्भात त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (‘एफएसएसएआय’) ने म्हटले आहे, की अन्न व्यवसायात गुंतलेल्या सर्व कंपन्यांना फळांच्या रसाच्या बॉक्सवरील लेबल आणि जाहिरातींमधून हा दावा काढून टाकावा लागेल. अनेक कंपन्या सतत असे दिशाभूल करणारे दावे करत असल्याची माहिती ‘एफएसएसएआय’ ला मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येते. सर्व ‘एफबीओ’ ला एक सप्टेंबर २०२४ पूर्वी प्री-प्रिंट केलेले पॅकेजिंग साहित्य पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आणि मानके (जाहिरात आणि दावे) नियम- २०१८ नुसार कोणतीही कंपनी शंभर टक्के नैसर्गिक फळांच्या रसावर दावा करू शकत नाही. या सर्व रसांमध्ये सर्वाधिक पाणी असते. त्यात थोड्या प्रमाणात फळांचा रस किंवा लगदा घातल्याने तो शंभर टक्के रस बनत नाही. ‘एफएसएसएआय’ नुसार, अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. जर जास्त साखर असेल तर तुमचे उत्पादन गोड रस म्हणून घोषित करावे लागेल. सर्व ‘एफबीओं’ना अन्न सुरक्षा आणि मानक नियमावलीच्या नियमांमध्ये काम करण्यास सांगितले आहे. जर त्यांच्या रसामध्ये प्रति किलो १५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर असेल, तर त्यांना त्यांच्या उत्पादनास गोड रस म्हणून लेबल करावे लागेल. दिशाभूल करणारे दावे करून आम्ही कोणत्याही कंपनीला ग्राहकांचे नुकसान करू देणार नाही, असा इशारा ‘एफएसएसएआय’ ने दिला आहे.