इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ने बहुमत प्राप्त केल्यानंतर मोदी यांनी मावळत्या सरकारचा राजीनामा दिला. आता सरकार स्थापण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून आठ तारखेला मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकट्या भाजपला बहुमताचा २७२ हा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी मोदी यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्यांची गरज लागणार आहे. मोदी यांनी १७ लोकसभेची मुदत संपत असल्याने नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी आपल्या सरकारचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करताना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडी दोन्ही आघाड्यांच्य बैठकांचा जोर दिल्लीत सुरू झाला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला खरा; परंतु ‘एनडीए’ला ‘अब की बार आघाडी सरकार’ स्थापन करावे लागणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते; परंतु या वेळी बहुमताने हुलकावणी दिल्याने मोदी यांना आता मित्र पक्षांच्या मर्जीवर सरकार चालवावे लागेल. मोदी यांनी ‘एनडीए’च्या घटक पक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. १७ व्या लोकसभेची मुदत आजच संपत असल्याने मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल. मोदी यांचा शपथविधी आठ तारखेला रात्री आठ वाजता होण्याची शक्यता आहे.