इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपचे केंद्रीय मंत्री असलेले तीन उमेदवार राज्यात पराभूत झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे कल्याण काळे यांनी पराभव केला. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी केला. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांनी केला.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. अतिशय हायप्रोफाईल अशी ही लढत मानली जात होती. भाजपला या जागेवर जिंकून येण्याचा विश्वास होता. पण काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांचा अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव केला.
धुळे लोकसभा मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे हे गेल्या १० वर्षांपासून खासदार धुळ्याचे खासदार होते. पण त्यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाल्या. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचा इथे विजय झाला.
अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. येथे नवनीत राणा जिंकून येतील, अशी शक्यता होती. पण काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.
नंदुरबारमध्ये देखील नंदुबारमध्ये विद्यमान खासदार हिना गावित या विजयाची हॅटट्रीक मारण्यात यशस्वी होतात का? याबाबत सस्पेन्स होता. पण काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी त्यांचा पराभव केला.
वर्धा लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून भाजपचे खासदार असलेले रामदास तडस यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी पराभव केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे.