नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधानांनी ‘रेमल’ चक्रीवादळाच्या प्रभावाचा रविवारी नवी दिल्ली येथील ७ लोककल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी आढावा घेतला.चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या राज्यांमधल्या स्थितीबाबत या बैठकीत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. पूर आणि भूस्खलनामुळे मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तसेच मालमत्तेच्या नुकसानाबाबतही बैठकीत चर्चा झाली. गरजेनुसार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली. या पथकांनी अडकलेल्यांची सुटका, एअरलिफ्टिंग आणि रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमा पार पाडल्या. गृह मंत्रालय राज्य सरकारांच्या नियमित संपर्कात असल्याचे या बैठकीत नमूद करण्यात आले.
चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या राज्यांना केंद्र सरकार पूर्ण मदत करत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरवण्याकरिता नियमितपणे आढावा घेण्याचे निर्देश पंतप्रधानांनी गृह मंत्रालयाला दिले. पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव,एनडीआरएफचे महासंचालक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्यासह पंतप्रधान कार्यालय आणि संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.