इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मद्यपान करून दोन गाड्यांना मागून धडक दिली.या प्रकरणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. के पाटील असे या मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. कल्याणी नगर परिसरात बिल्डरच्या मुलाने मद्यपान करून, पोर्शे कारखाली दोघांना चिरडल्याच प्रकार देशभर गाजत असताना ही घटना घडली.
पाटील हे तळेगाव ते तळेगाव स्टेशन दरम्यान कार चालवत होते. या वेळी त्यांनी दोन गाड्यांना धडक दिली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात सिद्धराम लोणीकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात झाल्यानंतर मुख्याधिकारी पाटील घरी गेले. त्यांना आणण्यासाठी काही पोलिस घरी गेले; परंतु त्यांनी घराचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी जादा फौजफाटा घेऊन पाटील यांचे घर गाठले. त्यानंतर पोलिसांनी पाटील यांना ताब्यात घेतले. मुख्याधिकारी पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेऊन त्यांची चाचणी करण्यात आली.