इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
न्युझीलंड विरूद्ध भारतीय संघाचा इतिहास फारसा चांगला नसला तरी भारताने काल दमदार विजय मिळवत न्यूझीलंडला पराभूत करुन अव्वल स्थान मिळवले. या विजयाने भारतीय संघ आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. खरं तर इतिहास बदलण्यासाठीच भारतीय संघ मैदानात उतरला व त्याने शानदार विजय मिळवला. या विजयात विराट कोहलीची जादू व मोहम्मद शमीने १० षटकात ५४ धावा देऊन घेतलेले ५ बळी ही गोष्ट मात्र लक्षवेधी ठरली.
२०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघ गेल्या ४ सामन्यात निर्विवादपणे अपराजित राहून दुसऱ्या क्रमांकावर होता. तो कालच्या सामन्याने आता पहिल्या क्रमांकावर गेला आहे. दुसरीकडे न्युझीलंड देखील ४ सामन्यात पराभूत झालेला नव्हता, नेट रनरेटमध्येही तो पुढे होता. पण, आता तो दुस-या क्रमांकावर गेला आहे.
हिमाचलच्या सर्वांगसुंदर अशा धरमशाला येथील मैदानावर या दोघांपैकी कुठल्या तरी एका नावासमोर पराभवाचा ठसा उमटणार होता. तो न्यूझीलंडच्या नावावर उमटला. खरं तर १९९२ पासून आत्तापावेतो ज्या एकूण ९ इव्हेन्ट मध्ये भारताची गाठ न्युझीलंडसोबत पडली आहे. त्यापैकी ८ सामन्यात न्युझीलंडचा तर अवघ्या एका सामन्यात भारताचा विजय झाला. १९९२ च्या वन-डे विश्वचषक स्पर्धेनंतर १९९९ साली न्युझीलंडने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर सन २००० ची चॅम्पिअन्स ट्रॅाफीची फायनल, २००७ आणि २०१६ च्या टी२० विश्वकप स्पर्धेतल्या साखळीत झालेला पराभव, पुन्हा २०१९ मध्ये वन-डे विश्वचषक स्पर्धेतल्या सेमी-फायनलमध्ये झालेला पराभव, २०२१ च्या विश्व टेस्ट चॅम्पिअनशिप मधला ओल्ड ट्ररॅफर्ड इथला पराभव आणि त्यानंतर शेवटी अद्यापही ताजा असलेला २०२१ मधील टी२० विश्वकप स्पर्धेतल्या साखळीतला पराभव ही न्युझीलंड संघाची भारतीय संघाविरूध्दची आजवरची कामगिरी होती.
ती कालच्या सामन्यात बदलली गेली. याअगोदर आयसीसी सामन्यातील पराभवाच्या यादीत २००३ साली भारताने सेंच्युरिअन मध्ये वन-डे विश्वचषक स्पर्धेत न्युझिलंडवर मिळवलेला एकमेव आयसीसी विजय होता आता हा आकडा दोनवर गेला आहे. भारताविरुध्द पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत ८ पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. नवव्या वेळेसही त्यांना भाराताने विजय मिळवू दिला नाही. त्यामुळे भारतीय प्रेक्षक आनंदात होते. कालच्या सामन्यात त्यांच्या आनंदात अजून भर पडली.
कोहली खेळतोय आणि भारतीय संघ जिंकतोय. हे सुत्र न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात देखील तंतोतंत लागू पडले. भारताने न्युझीलंडविरुध्द दोन दशकांपासून सुरू असलेला विजयाचा दुष्काळ काल संपवली ही आनंदाची गोष्ट असून भारताची वाटचाल ही विश्वचषक पटकावण्याच्या दिशेन दमदार सुरु आहे….