इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज 7 व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या सातव्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या टप्प्यात रात्री 8:45 पर्यंत अंदाजे 59.45% मतदान झाले.
ओदिशात लोकसभा मतदारसंघांसह 42 विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी मतदान झाले. सातव्या टप्प्यातील मतदानाच्या समाप्तीसह सार्वत्रिक निवडणुका 2024 साठीचे मतदान आता पूर्ण झाले आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचे मतदान देखील पूर्ण झाले आहे.
लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका तसेच आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभेच्या मतांची मोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतमोजणी 2 जून 2024 रोजी होईल.
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मतदार, मतदान कर्मचारी, कायदा अंमलबजावणी संस्था, सुरक्षा दले आणि निमलष्करी दल, स्वयंसेवक, भारतीय रेल्वे आणि हवाई दल यासह सर्व भागधारकांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सातव्या टप्प्यात रात्री 8:45 पर्यंत अंदाजे 59.45% मतदान झाले असून मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपवर राज्य, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ निहाय अपडेट केली जाईल. ही आकडेवारी राज्य, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ अशा आकड्यांव्यतिरिक्त प्रत्येक टप्प्यानुसार देखील देण्यात देईल. याशिवाय हितधारकांच्या सोयीसाठी आयोग रात्री 23:45 वाजता मतदानाच्या आकडेवारीसह दुसरे प्रसिद्धी पत्रक जारी करेल.