पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोर्श कारच्या धडकेच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शिरुर तालुक्यात पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने तीस वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मालवाहू पिकअप बाईकसकट त्या चालकाला २० ते ३० फुटांपर्यंत फरपटत नेले.याप्रकरणी सतीश मेमाणे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह टेम्पो चालवणाख्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (वय अंदाजे १५) ही पिकअप वाहन चालवत असताना तिच्या शेजारील सीटवर पोलिस पाटील बसले होते; मात्र अचानक तिच्या मालवाहू टेम्पोची बाईकला धडक बसून बाईकसकट चालकही बराच दूरपर्यंत फरपटत गेला. हा अपघात झाल्यानंतर पोलिस पाटील आणि त्याची मुलगी मदतीसाठी न येता मालवाहू टेम्पो तिथेच सोडून पळून गेले. या अपघातात अरुण मेमाणे याचा मृत्यू झाला. आणखी एक व्यक्ती जखमी झाली.