इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत आज संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) , पंतप्रधान कार्यालय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. भूतकाळातीच्या विपरीत, आपले सशस्त्र दल ड्रोन, हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि यूएव्हीसह प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी तयार आहेत, असे ते म्हणाले.
युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (यूएसआय) ने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हलमध्ये डॉ.जितेंद्र सिंह बोलत होते.ते म्हणाले की संरक्षण परिदृश्य बदलण्याची क्षमता असलेल्या नवीन विघटनकारी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भारत विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आहे. यामुळे फक्त देशाची राष्ट्रीय सुरक्षाच वाढते असं नाही, तर संरक्षण क्षेत्रातील जागतिक तंत्रज्ञानाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे हे सिद्ध होते.
“आमच्या सैन्याने कालबाह्य शस्त्रे वापरण्याची वेळ गेली. आम्ही क्वांटम तंत्रज्ञान वापरत असलेल्या जगातील सात विकसित देशांपैकी आहोत. याच दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी मार्चमध्ये राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले.” असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की हे विघटनकारी तंत्रज्ञान सतत विकसित होत आहेत आणि त्यांचा लष्करी कारवायांवर प्रभाव वाढतच जाणार आहे. आधुनिक युगात लष्करी सामर्थ्य आणि राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि त्यांचा उपयोग करणे आवश्यक आहे.